Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह)
संगीत शांतिब्रह्म नाटकातील एक दृश्य

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...
.......
‘श्रीमंत भूतकाळ असणं, ही आत्ताच्या काळातील न मोजता येणारी संपत्ती आहे.’ नाट्यसंजीवनी या उपक्रमाबद्दल अभिप्राय देताना पुण्याच्या संजीव ताटके यांनी हे विधान केलं आहे आणि ते एका अर्थानं खरं आहे. कारण आपलं सांस्कृतिक संचित किती आहे त्यावरून प्राचीन परंपरांची समृद्धी मोजता येते. मागोवा घेता येतो. 

‘घन अमृताचा’च्या यशानंतर पुढे काय अशी एक विचारणा होत होती. मी तेव्हा अन्य लेखनामध्ये व्यग्र होतो. नोकरी सांभाळून कथा, कादंबरी आणि दीपावली अंकांसाठी लेखन चालूच होतं. शिवाय बेळगावच्या तरुण भारतच्या ‘अक्षरयात्रा’ या रविवारच्या पुरवणीसाठी दर आठवड्याला सदरलेखनही चालू होतं. 

संत साहित्यातून, संतविचारातून समाजमन घडत असतं, या मध्यवर्ती कल्पनेसाठी मी संतसाहित्याचा अभ्यास करीत होतो. आणि माझ्या लक्षात आलं, की एरव्ही शांत रसात्मक रचना करणारी संतांची लेखणी, समाज सुधारण्यासाठी कधी कधी रौद्र, ग्राम्य, संतापी बनते आणि, ‘बुडती हे जन, न देखवे डोळा’ या वृत्तीने आसूड फटकारते. 

त्यामुळे ‘अक्षरयात्रा’मध्ये ‘रौद्रलेणी’ या शीर्षकांतर्गत मी अनेक संतांच्या अशा प्रकारच्या रचनांचा मागोवा घेत सदर लिहीत राहिलो. त्या अभ्यासाच्या वेळी संत एकनाथांच्या वेगवेगळ्या रचनांनी खूप भुरळ घातली. इतकी, की त्यांच्या रचना, त्यांचं आयुष्य, त्यांच्या मुलानं, हरिपंतानं केलेली वैचारिक बंडाळी, त्यातून शांतिब्रह्म असणाऱ्या नाथांनी, शांतपणे, धीरोदात्तपणे समाजाला आपल्या वागणुकीतून दिलेलं उत्तर, हे सगळं मला एका नाटकाच्या लेखनासाठी विलक्षण वाटू लागले. 

मी ‘खल्वायन’च्या मित्रांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि मग आकाराला आलं ‘शांतिब्रह्म!’

या नाटकाबद्दल खूप आठवणी आहेत, पण त्या पुन्हा केव्हा तरी... 

फक्त आज एक मनोज्ञ आठवण. 

स्पर्धेपूर्वी, पटवर्धन प्रशालेत या नाटकाची रंगीत तालीम ठेवली होती. अगदी मोजक्या श्रोत्यांना संस्थेनं बोलावलं होतं. त्यात, व्यावसायिक रंगभूमीवर अनेक यशस्वी नाटकं लिहिणारे प्रख्यात नाटककार आणि कथाकार प्र. ल. मयेकर यांनासुद्धा निमंत्रित केलं होतं. 

‘खल्वायन’ने अक्षरशः जीव ओतून तयारी केली होती. नेपथ्य, वेशभूषा इथपासून दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, सर्वांचा अभिनय या सगळ्यात जीव ओतला होता; पण प्र. ल. मयेकर हे प्रतिभावान लेखक आपलं नाटक बघायला आले आहेत, याचं प्रचंड दडपण माझ्यावर होतं. 

पहिल्या अंकाच्या शेवटी, ‘समाजाच्या मनाची कवाडं उघड’ अशी विनवणी करून, ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत नाचणारा श्रीखंड्या बेभान होऊन नाचला होता. श्रीखंड्याचं काम करणारा आनंद प्रभुदेसाई अक्षरशः बेभान झाला होता. त्याचं नृत्य, त्याचं गाणं, ऑर्गन, तबलजी आणि पखवाज यांनी त्याला दिलेली साथ यामुळे पहिला अंक खूप उंचीवर गेला होता. 

पहिल्या अंकाचा पडदा पडला. मी पाठीमागं अजूनही अस्वस्थ होतो. लक्ष ‘प्र. ल.’ काय म्हणतात तिकडे लागलेलं होतं. एका अंकानंतर ते निघून जाणार होते. मी पाहिलं, तेव्हा कुणी तरी त्यांच्या हाती दिलेला चहाचा कप बेंचवर ठेवून, ते माझ्याकडे आले. आणि काय होतंय हे कळायच्या आत त्यांनी मला मिठी मारली आणि सर्वांना जवळ बोलावून ते म्हणाले, ‘पहिल्या अंकावरून सांगतो, तुमचं हे नाटक अनेक पारितोषिकं घेऊन राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं येणार!! सरांनी खूप ताकदीनं नाटक लिहिलंय आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलीय.’

माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि अर्थातच ते आनंदाचे होते. प्र. ल. मग किती तरी वेळ नाटकातील आवडलेल्या गोष्टी सांगत बसले... आणि हो, ते पूर्ण नाटक बघून घरी गेले. 

प्र. ल. मयेकर यांची भविष्यवाणी खरी ठरली. राज्य संगीत नाट्यस्पर्धेत शांतिब्रह्म प्रथम पारितोषिकविजेतं ठरलं. 

त्या नाटकातील हे पद. 

संत एकनाथ आणि त्यांची पत्नी गिरिजाबाई या दोघांचा प्रवेश. गिरिजाबाई गत काळातील आठवणी जागवत आहेत; पण त्यांच्या शब्दांतील अर्थाला संत एकनाथ परमेश्वराच्या आणि भक्ताच्या अद्वैताचे तत्त्वज्ञान मानून, शिवशक्तीचे प्रतीक म्हणून कसे पाहतात, अशा अर्थाचे पुढचे सगळे संवाद आहेत; पण त्या पदातून गिरिजाबाईंना काही वेगळं सांगायचं असतं, जे श्रीखंड्याच्या अस्तित्वाबद्दलचं असतं. 

ऐकू या ते पद... 

संगीत : विजय रानडे. 
गायिका : प्राजक्ता लेले.
ऑर्गन साथ : वरद सोहनी. 
तबला साथ : केदार लिंगायत. 

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZCPCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग आठवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा आठवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग सातवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा सातवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language